रेवनाळच्या सुवर्णा वाघमोडे यांना पद्मश्री सिंधुताई सपकाळ महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर 

  • By admin
  • October 18, 2025
  • 0
  • 45 Views
Spread the love

शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल

रेवनाळ (ता. जत, जि. सांगली) ः रेवनाळ हायस्कूलमधील वरिष्ठ शिक्षिका सुवर्णा दिलीप वाघमोडे यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री सिंधुताई सपकाळ महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांच्या शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदानाचा गौरव म्हणून प्रदान करण्यात येणार आहे.

सुवर्णा वाघमोडे या महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था, सांगली संचलित रेवनाळ हायस्कूलमध्ये गेली २८ वर्षे गणित व विज्ञान विषयाच्या कुशल अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा एसएससी निकाल नेहमीच १०० टक्के राहिला असून अनेक विद्यार्थ्यांनी गुणवंतांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

संस्थेचे चेअरमन आर एस चोपडे यांच्या प्रेरणेतून सुवर्णा वाघमोडे यांनी विद्यालयात “अहिल्या पॅटर्न” प्रभावीपणे राबवला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमांतर्गत शाळेला मिळालेल्या यशात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.शाळेतील ज्येष्ठ आणि प्रबोधनशील शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गासाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत.

ग्रामीण भागातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी निःस्वार्थपणे कार्य केले आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक उन्नतीचा संदेश देणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य ध्येय राहिले आहे. त्यांना यापूर्वीही ‘आदर्श माता पुरस्कार’ (सुसंगत फाउंडेशन, पुणे) तसेच अनेक स्थानिक आणि विभागीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन पद्मश्री सिंधुताई सपकाळ महाराष्ट्र रत्न पुरस्कार समिती, पुणे यांनी त्यांची यंदाच्या वर्षी साठी निवड केली आहे.

हा मानाचा पुरस्कार १६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराची घोषणा होताच रेवनाळ परिसरात आनंदाची लाट उसळली असून ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सौ. सुवर्णा वाघमोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. छोट्या ग्रामीण भागातून राज्यस्तरीय असा मानाचा सन्मान मिळवणे हे रेवनाळ गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *