
महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संघटनांची उच्चस्तरीय बैठक
मुंबई : महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास, खेळाडूंचे हित आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारणी या महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगला, मलबार हिल येथे राज्यातील विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीस नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच विविध राज्य क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्हा क्रीडा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील क्रीडाविकासासाठी एकात्मिक धोरण राबविण्याच्या उद्देशाने ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा उभारणी, ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची उभारणी, शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर क्रीडेला प्रोत्साहन, तसेच राज्य क्रीडा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्र सरकार हे राज्यातील प्रत्येक प्रतिभावान खेळाडूला योग्य प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी कटिबद्ध आहे. क्रीडा क्षेत्रातील संघटनांनी परस्पर सहकार्याने कार्य केल्यास महाराष्ट्र देशाला आणि जगाला अधिकाधिक नामांकित खेळाडू देऊ शकेल.”
बैठकीदरम्यान विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यातील क्रीडा विकासासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आणि मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या गांभीर्याने ऐकून त्वरित कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
या बैठकीत महाराष्ट्र यॉटिंग असोसिएशनचे माजी खासदार मनोज कोटक, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे संजय शेटे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे रणजीत सावरकर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी, महाराष्ट्र स्क्वॉश असोसिएशनचे सचिव दयानंद कुमार, ट्रायथलॉन संघटनेचे डॉ प्रदीप खांडरे, बास्केटबॉल असोसिएशनचे चेतन आमीन आणि पियुष अंबुलकर, तसेच कुस्ती असोसिएशनचे संदीप भोंडवे व हिंदकेसरी योगेश दोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली आणि राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने सर्व संघटनांना “खेळाडू प्रथम” या तत्त्वावर कार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील क्रीडा संरचना अधिक सक्षम होऊन राज्यातील नवोदित खेळाडूंना पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.