असरार इलेव्हन संघाला विजेतेपद 

  • By admin
  • October 18, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

शेख हबीब स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धा ः अष्टपैलू गौतम रघुवंशी सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः शेख हबीब स्मृती टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत असरार इलेव्हनने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात असरार इलेव्हनने इम्रान पटेल २२ नाबाद संघावर सहा विकेट राखून सहज विजय नोंदवला. या सामन्यात गौतम रघुवंशी याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

गरवारे क्रिकेट मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला. विजेतेपदाच्या सामन्यात इम्रान पटेल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १८.२ षटकात सर्वबाद १३४ असे माफक लक्ष्य उभे केले. असरार इलेव्हनसमोर विजयासाठी १३५ धावांचे आव्हान होते. असरार इलेव्हनने १६.५ षटकात चार बाद १४० धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात गौतम रघुवंशी याने शानदार फलंदाजी केली. त्याने ४४ चेंडूत ५५ धावांची दमदार खेळी केली. अर्धशतकी खेळीमध्ये गौतमने सात चौकार व एक षटकार मारला. इशांत राय याने आक्रमक फलंदाजी करत १६ चेंडूत ३२ धावा फटकावल्या. इशांतने दोन चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. आकाश बोराडे याने १८ चेंडूत ३२ धावांची वेगवान खेळी करुन मैदान गाजवले. आकाशने पाच चौकार व एक षटकार मारला. 

गोलंदाजीत गौतम रघुवंशी याने प्रभावी गोलंदाजी केली. गौतमने ४ षटकात केवळ १८ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे गौतम रघुवंशी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. निळकंठ तनपुरे याने २७ धावांत दोन गडी बाद केले. ऋषिकेश नायर याने ३४ धावांत दोन बळी टिपले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *