
नंदुरबार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या मार्फत रायगड जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच अलिबाग (जि. रायगड) येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत श्रीमती एच जी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला.
या स्पर्धेत १७ वयोगटात रितेश पाटील याने रौप्य पदक, खुशी चव्हाण हिने कांस्य पदक जिंकले तर अनुष्का चौधरी हिने सहभाग घेतला. या कामगिरीमुळे श्रॉफ हायस्कूलने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट शारीरिक तयारी, जिद्द आणि आत्मविश्वास दाखवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
या विजयी खेळाडूंच्या यशाबद्दल शाळेत आणि शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड रमणलाल शाह आणि सचिव डॉ योगेश देसाई यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा गौरव केला.
या यशामागे क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर आणि हेमचंद्र मराठे यांचे समर्पित मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल बोलताना मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना भविष्यात आणखी मोठ्या यशासाठी प्रोत्साहन दिले.