
सोलापूर : सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच पार पडलेल्या शहर मैदानी क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. उत्कृष्ट संघभावना, तयारी आणि जिद्द यांच्या जोरावर खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत विद्यार्थिनींची लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यात सांघिक प्रकारात ४x४०० मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक तर १०० मीटर रिले प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला. या संघात रोहिणी लांडगे, वैभवी गायकवाड, वैष्णवी भुसे, संध्या डोंगरे, अर्चना देशमुख आणि राजनंदिनी भोसले यांचा समावेश आहे.
व्यक्तिगत स्पर्धेत श्रावणी मोरे हिने थाळी फेक प्रकारात द्वितीय क्रमांक, रोहिणी लांडगे हिने भाला फेक प्रकारात द्वितीय क्रमांक, राजनंदिनी भोसले हिने लांब उडी, उंच उडी आणि ४०० मीटर अडथळा शर्यत या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा लोंढे हिने १०० मीटर अडथळा शर्यत प्रथम, उंच उडी द्वितीय, लांब उडी तृतीय क्रमांक मिळवला. वैभवी गायकवाड हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. अर्चना देशमुख हिने १०० मीटर अडथळा शर्यत प्रकारात द्वितीय क्रमांक आणि कृपा डोंगरे हिने तिहेरी उडी प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला.
या सर्व विजयी विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका प्रा आरती मलजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या मेहनतीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक यशस्वी पायरी गाठली आहे. महाविद्यालयात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थिनींचे सर्व शिक्षकवर्ग, पालक आणि व्यवस्थापन तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.