
विदर्भ संघाचा डावाने विजय, मुंबई ३५ धावांनी विजयी
तिरुवनंतपुरम ः रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने जोरदार प्रत्युत्तर देत गतउपविजेत्या केरळ संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत सामना अनिर्णित राखला. गतविजेत्या विदर्भ आणि मुंबई संघांनी आपापले सामने जिंकून विजयी सलामी दिली आहे.
महाराष्ट्र संघाची केरळ संघाविरुद्ध पहिल्या डावात खळबळजनक सुरुवात झाली होती. चार बाद शून्य अशा खराब स्थितीतून महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतली हे विशेष. ऋतुराज गायकवाड (९१), जलज सक्सेना (४९), विकी ओस्तवाल (३८), रामकृष्ण घोष (३१) यांनी शानदार फलंदाजी केली. केरळच्या निधीश याने ४९ धावांत पाच विकेट घेतल्या. बासिलने ५७ धावांत तीन बळी घेतले.
केरळ संघाचा पहिला डाव २१९ धावांत सर्वबाद झाला. त्यात संजू सॅमसनने सर्वाधिक ५४ धावा काढल्या. महाराष्ट्राच्या जलज सक्सेना (३-४६), रजनीश गुरबानी (२-४९), मुकेश चौधरी (२-५७), विकी ओस्तवाल (२-२५) यांनी प्रभावी कामगिरी बजावत संघाला आघाडी मिळवून दिली.

दुसऱया डावात महाराष्ट्राने शानदार सुरुवात केली. पृथ्वी शॉ याने १०२ चेंडूत ७५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने सात चौकार मारले. अर्शीन कुलकर्णी याने पाच चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले. सिद्धेश वीर याने १९७ चेंडूत नाबाद ५५ धावांची चिवट खेळी केली. त्याने दोन चौकार मारले. ऋतुराज गायकवाड याने ८१ चेंडूत नाबाद ५५ धावा काढल्या. सलग दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक साजरे केले. त्याने तीन चौकार मारले.
विदर्भ डावाने विजयी
गतविजेत्या विदर्भ संघाने नागालँड संघावर एक डाव आणि १७९ धावांनी विजय साकारला. अमन मोखाडे हा सामनावीर ठरला. विदर्भ संघाने पहिल्या डावात ४६३ असा धावांचा डोंगर उभारला. नागालँड संघ पहिल्या डावात १७१ आणि दुसऱया डावात ११३ धावांवर गारद झाला.
मुंबईचा ३५ धावांनी विजय
मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील सामना चुरशीचा झाल. यात मुंबई संघाने ३५ धावांनी विजय साकारला. मुंबई संघाने पहिल्या डावात ३८६ धावा काढल्या. जम्मू काश्मीर संघ पहिल्या डावात ३२५ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मुंबई संघ दुसऱया डावात १८१ धावांवर बाद झाला. जम्मू काश्मीरचा दुसरा डाव २०७ धावांवर रोखून मुंबईने हा सामना ३५ धावांनी जिंकला. शम्स मुलानी हा सामनावीर ठरला.