रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत वीरेश, अर्जुन, क्षितिजला विजेतेपद

  • By admin
  • October 20, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

पुणे ः दिवाळी सणाच्या निमित्ताने बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बीकेटी रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत वीरेश, अर्जुन कौलगुड, क्षितिज प्रसाद यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह या  ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सातव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत वीरेश याने अविरत चौहानला बरोबरीत रोखले व गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. वीरेशने किंग्ज इंडियन अटॅक पद्धतीने डावास सुरुवात केली व ४५चालीमध्ये अविरतला बरोबरीत रोखले. वीरेश हा सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत आहे. तर, याच गटात अविरत चौहानने ६ गुण (२८.५ बुकोल्स कट) गुण सरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक आणि आदित्य जोशीने ६ गुण (२७.५ बुकोल्स कट) गुण सरासरीच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला.

१० वर्षांखालील गटात अर्जुन कौलगुडने ग्रीन फील्ड पद्धतीने डावास सुरुवात करत विहान शहाचा ५० चालींमध्ये पराभव केला व ६.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. अर्जुन हा पवार पब्लिक शाळेत पाचवी इयत्तेत शिकत आहे. तर, शौर्य भोंडवेने शौर्य भोंडवेने रेयांश चौधरीचा पराभव करून ५.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले.

१४ वर्षांखालील गटात क्षितिज प्रसादने परम जालनचा पराभव करून ६.५ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. क्षितिज हा बिशप शाळेत पाचवी इयत्तेत शिकत आहे. तर, देवनानी गर्वने क्रिशिव शर्माचा पराभव करून ६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अविनाश आलुरकर व पीडीसीसीचे संयोजन सचिव राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे, पवन कातकडे, चीफ आर्बिटर आयए अथर्व गोडबोले, श्रद्धा विंचवेकर आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *