
निर्णय घेण्यासंदर्भात सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाची टोलवा-टोलवी
अजितकुमार संगवे
सोलापूर ः सांगोला तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत बोगस खेळाडू खेळविल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी हे दोन प्रथम श्रेणीचे अधिकारी निर्णय घेण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
सांगोला तालुका क्रीडा संकुल येथे पाच व सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या गटात बोगस खेळाडू खेळवले असल्याची तक्रार पराभूत झालेल्या संघानी अंतिम सामन्याच्या वेळेस दाखल केली होती. यात १७ वर्षांखालील गटात पियुष खलसोडे व गजानन शेळके तर १९ वर्षाखालील गटात स्वप्नील लाड याच्याविरुद्ध ही तक्रार आहे.
पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांनी संबंधित शाळेत भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्षात तपासणी केली. यात हे खेळाडू बोगस असल्याचे सिद्धही झाले आहे. परंतु याचा निर्णय कोण घ्यायचा हे दोन्ही प्रथम श्रेणीचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगोला तालुका क्रीडा अधिकारी यांचा अतिरिक्त कार्यभार मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वरकड यांच्याकडे सोपविला आहे. त्यानी यांचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणतात. ’मी अहवाल त्यांना दिला आहे. निर्णय जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी घ्यायचा आहे,’ असे वरकड यांचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे निर्णयास विलंब
मुलांच्या १९ वर्षांखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल सांगोला व कोळा विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज तर १७ वर्षांखालील गटात कडलास हायस्कूल व जवळा हायस्कूल हे अनुक्रमे विजयी व उपविजयी झाले आहेत. क्रीडा व युवक सेवा खात्याच्या ८ ऑक्टोबरच्या पत्रानुसार बोगस किंवा जास्त वयाचा खेळाडू स्पर्धेत भाग घेतला असल्यास त्या संघास बाद करावे आणि संबंधित खेळाडूचा प्रत्यक्ष सहभाग नसल्यास त्या खेळाडूस बाद करावे अशा मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु या शिक्षण संस्थेच्या संबंधात असलेले सांगोला तालुक्यातील लोकप्रतिनिधी या दोन्ही अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. तसेच हे लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यामार्फत दबाव टाकण्याचाही प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच हा निर्णय होत नसल्याचे समजते. उलट-सुलट निर्णय होण्यापेक्षा क्रीडा संचालक व क्रीडा आयुक्त यांनी यात लक्ष देऊन अचूक निर्णय घेण्याची गरज आहे.
प्रत्यक्ष तपासणी करून निर्णय घ्या
या घटनेची प्रत्यक्ष तपासणी करून निर्णय घेण्याचे आदेश देऊन कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडाअधिकारी नरेंद्र पवार यांना दिले आहेत. अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.
- युवराज नाईक, क्रीडा उपसंचालक पुणे विभाग.