राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत ‘गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी’चे उल्लेखनीय यश

  • By admin
  • October 20, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

मुंबई ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या मान्यताप्राप्त राज्य संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या आठ विभागांतील निवडक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी, नवी मुंबईच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदके पटकावून राज्यस्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

सर्व खेळाडूंनी यापूर्वी मुंबई विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला होता. विशेष उल्लेखनीय म्हणजे, श्रवण भरत भोसले हा १४ वर्षांखालील गटात मुंबई विभागातील एकमेव सुवर्णपदक विजेता ठरला असून त्याची निवड आता राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२५-२६, कोहिमा (नागालँड) साठी झाली आहे.

या सर्व यशामागे मुख्य प्रशिक्षक रोहित तानाजी सिनलकर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रेम विलास पाटणे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकवर्ग यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उल्लेखनीय यशामुळे गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीने राज्यस्तरावर आपली छाप सोडली असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्पर्धेतील विजेते खेळाडू

सुवर्णपदक : श्रवण भरत भोसले (१४ वर्षांखालील मुले (२९ ते ३२ किलो).

कांस्यपदक : राज सदाशिव जाधव (१७ वर्षांखालील मुले (४८ ते ५१ किलो), प्रनुषा रावत (१७ वर्षांखालील मुली (५९ ते ६३ किलो).

सहभाग : ओमकार लक्ष्मण चव्हाण (१९ वर्षांखालील मुले (७३ ते ७८ किलो).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *