
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः स्वप्नील चव्हाण, समाधान पांगारे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत यंग ११ आणि असरार ११ या संघांनी शानदार विजयासह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यांमध्ये स्वप्नील चव्हाण आणि समाधान पांगारे यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यंग ११ संघाने इम्रान पटेल २२ नाबाद संघावर चार विकेट राखून विजय संपादन केला. या लढतीत इम्रान पटेल २२ नाबाद संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात आठ बाद १४८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना यंग ११ संघाने १९.३ षटकात सहा बाद १५४ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात आकाश बोराडे याने आक्रमक फलंदाजी केली. आकाशने ३४ चेंडूत ५३ धावा काढल्या. त्यात त्याने सात चौकार व दोन षटकार मारले. धीरज बहुरे याने ४६ चेंडूत ५० धावांची वेगवान खेळी केली. अर्धशतकी खेळीत धीरजने सहा चौकार व एक षटकार मारला. मधूर पटेल याने २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने तीन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले.
गोलंदाजीत स्वप्नील चव्हाण याने १८ धावांत तीन गडी टिपले. व्यंकटेश सोनवलकर याने १४ धावांत दोन गडी बाद केले. शुभम मोहिते याने १९ धावांत दोन बळी घेतले.

दुसऱया सामन्यात असरार ११ संघाने तीन विकेटने सामना जिंकला. या सामन्यात नाथ ड्रीप संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १४१ धावसंख्या उभारली. असरार ११ संघाने १८.४ षटकात सात बाद १४५ धावा फटकावत तीन गडी राखून विजय मिळवत आगेकूच केली.
या सामन्या अनिकेत काळे याने दमदार फलंदाजी करत ३५ चेंडूत ५१ धावा काढल्या. अनिकेतने एक षटकार व सहा चौकार मारले. यश यादव याने ३६ चेंडूत ५१ धावांचे योगदान दिले. त्याने आठ चौकार मारले. राहुल जोनवाल याने २२ चेंडूत २८ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले.
गोलंदाजीत समाधान पांगारे याने ३० धावांत तीन गडी बाद केले. प्रतीक भालेराव याने २२ धावांत दोन आणि मुस्तफा शाह याने १३ धावांत दोन बळी घेतले.