
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः इशांत राय सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत डीएफसी श्रावणी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने एम के डेव्हलपर्स संघाचा चुरशीच्या लढतीत १५ धावांनी पराभव केला. या लढतीत इशांत राय सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सामन्यात इशांत राय याने प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे त्याचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १९.१ षटकात सर्वबाद १३१ असे माफक लक्ष्य उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना एमके डेव्हलपर्स संघ १८.४ षटकात ११६ धावांत सर्वबाद झाला. अवघ्या १५ धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि डीएफसी श्रावणी संघाने आपली आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात लक्ष बाबर याने दमदार फलंदाजी केली. त्याने ३४ चेंडूत ४१ धावा काढल्या. त्यात त्याने सात चौकार मारले. मोहम्मद वसीम याने १२ चेंडूत २१ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. अली चाऊस याने १६ चेंडूत २० धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने दोन चौकार मारले.
गोलंदाजीत इशांत राय आणि सय्यद आरिफ या गोलंदाजांनी घातक मारा केला. इशांत राय याने २४ धावांत चार विकेट घेऊन संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे इशांत सामनावीर ठरला. सय्यद आरिफ याने १९ धावांत चार गडी बाद करुन सामना गाजवला. निलेश गवई याने १२ धावांत दोन बळी घेऊन आपला ठसा उमटवला.
या स्पर्धेतील उपांत्य सामने २५ ऑक्टोबर रोजी होतील आणि अंतिम सामना २६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक नीलेश गवई याने दिली आहे.