कोल्हापूर मनपास्तर शालेय अंडर १७ मुलींची क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न
कोल्हापूर ः कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर क्रिकेट अंपायर असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित मनपास्तर शासकीय शालेय १७ वर्षाखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा मेरीवेदर मैदानावर उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ सहाव्यांदा अजिंक्य ठरला आहे.
या स्पर्धेचे आयोजन महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी व मनपा प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शिवाजी कामते आणि सरदार पाटील यांनी केले.
अंतिम सामन्यात श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोल्हापूर या संघाने दमदार खेळ करत शांतीनिकेतन स्कूलवर एकतर्फी विजय मिळवून सलग सहाव्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरले.फायनल सामन्यात श्री साई हायस्कूलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
कर्णधार श्रावणी पाटील हिने संयमी निर्णय घेत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. संघाने केवळ ५ षटकांत ८१ धावा फटकावल्या. त्यामध्ये आराध्या पवार हिने अवघ्या २२ चेंडूत ६४ धावा करत झंझावाती खेळ सादर केला, तर श्रुतिका पाटील हिने ९ धावा जोडल्या.उत्तरादाखल शांतीनिकेतन स्कूलचा संघ १८ धावांवर गारद झाला.
या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आराध्या पवार हिला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. संघातील साक्षी डांगे, सेजल सुतार, तन्वी पाटील, सायली पाटील, संस्कृती रसाळे व स्वरा भांबुरे यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
विजेता साई हायस्कूल संघ
श्रावणी पाटील (कर्णधार), श्रुतिका पाटील (उपकर्णधार), स्नेहा पटेल, संस्कृती रसाळे, सायली पाटील, साक्षी डांगे, आर्या वर्मा, सेजल सुतार, अनघा पिसे, तन्वी पाटील, आराध्या पवार, वेदिका पाटील, पाचल माने, स्वरा भांबुरे, मैथिली कुरणे, वेदश्री गायकवाड.
संघाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे आणि मुख्याध्यापिका एम एस पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच संघाचे मार्गदर्शन क्रीडा प्रशिक्षक सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार, दिवाकर पाटील आणि सौम्यलता बिराजदार यांनी केले.
या स्पर्धेतून कोल्हापूरच्या मुलींच्या क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली असून, श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हा जिल्ह्यातील महिला क्रिकेटच्या क्षेत्रातील प्रेरणादायी केंद्र म्हणून उदयास येत आहे.



