सांगोला तालुका स्पर्धेत बोगस खेळाडू प्रकरणात कारवाई
सोलापूर ः बोगस खेळाडू खेळवल्यामुळे सांगोला तालुका कबड्डी स्पर्धेतील १७ व १९ वर्षांखालील गटातील दोन्ही विजयी संघांना बाद करण्याचा धाडसी निर्णय पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी घेतला आहे.
‘सांगोला तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत बोगस खेळाडू प्रकरणी राजकीय दबाव’ असे वृत्त दैनिक ‘स्पोर्ट्स प्लस’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी सुट्टी असतानाही २२ ऑक्टोबर रोजी सोलापुरातील जिल्हा क्रीडा कार्यालयास भेट देऊन कागदपत्राची पडताळणी केली. पडताळणीत मुलांच्या १९ वर्षाखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाचा स्वप्नील सागर लाड तर १७ वर्षाखालील गटात कडलास हायस्कूलचा पियुष तुकाराम खलसोडेच्या जन्मतारखेत तफावत आढळली. क्रीडा व युवक सेवा खात्याच्या ८ ऑक्टोबर २०२५च्या पत्रानुसार बोगस किंवा जास्त वयाचा खेळाडू स्पर्धेत भाग घेतला असल्यास त्या संघास बाद करावे आणि संबंधित खेळाडूचा प्रत्यक्ष सहभाग नसल्यास त्या खेळाडूस बाद करावे अशा मार्गदर्शक सूचना आहेत. दोन्ही खेळाडूंचा प्रत्यक्ष सामन्यात सहभाग असल्यामुळे दोन्ही संघाना बाद करण्याचा निर्णय युवराज नाईक यांनी घेतला आहे.
हा निर्णय सांगोला तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांनी आणि त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी घेणे अपेक्षित होते. परंतु या शिक्षण संस्थेच्या संबंधात असलेले सांगोला तालुक्यातील लोकप्रतिनिधी या दोन्ही अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते. तसेच हे लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यामार्फतही दबाव टाकण्याचाही प्रयत्न करीत होते. त्यामुळेच त्यांच्याकडून हा निर्णय होत नव्हता.
त्यामुळेच क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे बोगस खेळाडू खेळवण्याच्या वृत्तीस आळा बसेल, अशी अपेक्षा प्रामाणिकपणे खेळणाऱ्या संघानी दैनिक ‘स्पोर्ट्स प्लस’कडे व्यक्त केली आहे



