मुंबई ः महाराष्ट्रातील कुस्तीच्या विकासा करिता तसेच कुस्ती मधील नवीन नियमांची माहिती व्हावी तसेच इच्छुक नवीन पंच प्रशिक्षित व्हावेत या करिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने एकदिवसीय कुस्ती पंच प्रशिक्षण शिबीर मोहीम हाती घेतली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभाग, कुस्तीगीर संघ कल्याण डोंबिवली यांच्या वतीने एक दिवसीय कुस्ती पंच प्रशिक्षण शिबीर नुकतेच कल्याण येथील डॉन बॉस्को स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. कोकण विभागातील ४० पेक्षा जास्त पंच या शिबिरात सहभागी झाले होते. शिबिरात सर्वांचे स्वागत आणि सूत्रसंचालन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील अधिकारी राजेश भगत यांनी केले.
या पंच प्रशिक्षण शिबिरामध्ये मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील एनआयएस कुस्ती प्रशिक्षक वैभव माने यांनी भाग घेतला होता. त्यांना कुस्ती पंच परवाना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या शिबिरात नामवंत आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय कुस्ती पंच मारुती सातव, राष्ट्रीय कुस्ती पंच अंकुश वरखडे ,निलेश भगत हे देखील उपस्थित होते.



