नागपूर ः महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली नागपूर फेन्सिंग असोसिएशन तर्फे ३६ वी वरिष्ठ राज्यस्तरीय फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पालकमंत्री चषक म्हणून ओळखली जात असून तिचे उद्घाटन समारंभ रविवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता वीरांगना राणी अवंतीबाई लोधी तालुका क्रीडा संकुल, कारोळी (नागपूर) येथे होणार आहे.
या उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सतेज बंटी पाटील हे भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार आशिषदेशमुख (सावनेर) उपस्थित राहतील.
या प्रसंगी क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक, नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक संभाजी भोसले, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष शिवाजी राजे जाधव, डॉ पीयूष अंबुलकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, राज्य सचिव डॉ उदय डोंगरे, राजकुमार सोमवंशी, प्रवीण मानवतकर, सुरज येवतीकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील सर्वोत्तम फेन्सिंग खेळाडू सहभागी होऊन राज्य अजिंक्यपदासाठी झुंज देणार आहेत. स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट क्रीडा सुविधा असलेल्या कोरोडी क्रीडा संकुलात करण्यात आले असून खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठावर आपली कौशल्ये दाखविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मुख्य आयोजक नागपूर फेन्सिंग असोसिएशनने या कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर जिल्हा अध्यक्ष अजय सोनटक्के, नागपूर जिल्हा सचिव मोहम्मद शोएब, कोषाध्यक्ष सुरेश हजारे आदींनी पुढाकार घेतला आहे.



