महू (म.प्र.) ः श्रेयस अकादमी स्कूलच्या दोन कुशल खेळाडू सुरभि जैसवार आणि राधिका पंचोले यांची आगामी युनिव्हर्सल कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा विश्व कराटे महासंघ व नेपाळ कराटे फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर महिन्यात काठमांडू (नेपाळ) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या निवडीची घोषणा शोतोकान आंतरराष्ट्रीय कराटे फेडरेशन, मध्यप्रदेश यांच्या सर्वसंमतीने करण्यात आली. या दोन्ही खेळाडूंनी याआधी कन्याकुमारी येथे झालेल्या स्टेट बँक राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपले कौशल्य सिद्ध केले होते.

सुरभि आणि राधिका यांना प्रशिक्षक अमय लष्करी यांचे मार्गदर्शन आणि देवराज खौडे यांचे तांत्रिक प्रशिक्षण लाभत आहे. आगामी नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही खेळाडूंची उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात आणि स्पर्धेत सहभाग घेणार असून, तेथूनच त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होतील.
सुरभिचे वडील सुनील जैसवार आणि राधिकाचे वडील जसवंत पंचोले यांनी आपल्या कन्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल श्रेयस अकादमीचे प्राचार्य राज पाटील यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“सुरभि आणि राधिका या दोन्ही विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या यशामुळे शाळा आणि महूचा गौरव वाढला आहे,” असे प्राचार्य राज पाटील यांनी सांगितले.
या निवडीमुळे महू शहरात आणि शाळेत आनंदाचे वातावरण असून, दोन्ही खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतासाठी पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



