पुणे ः प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही स्वरूपसेवा संस्थेच्या मधुरांगण प्रकल्पामध्ये एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्र–गुजरात सीमेजवळील त्र्यंबक परिसरातील तोरंगण या आदिवासी भागातील ४२ मुलामुलींसोबत ही दिवाळी साजरी केली.धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत या पाच दिवसांत मुलांनी आपल्या घरच्याप्रमाणे, आनंद, स्नेह आणि उत्साहाने भरलेली दिवाळी अनुभवली.
धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल १० तासांच्या प्रवासानंतर मुले मधुरांगण येथे पोहोचली. दुसऱ्या दिवशी त्यांनी परिसरातील टेकडीवर छोटा ट्रेक केला, शाडू मातीचे मावळे बनवले आणि लव्ह केअर शेअर या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांसोबत किल्ला बांधण्याचा उपक्रम राबवला. संध्याकाळी गिरिप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी खेळ व गमती-जमतींनी दिवसाची सांगता केली.
तिसऱ्या दिवशी उटणे लावून अभ्यंग स्नान, नवीन कपड्यांची भेट, औक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवाळीचा आनंद अधिक रंगला. डॉ. केदार देसाई यांनी दातांची आणि आरोग्याची काळजी यावर माहिती दिली, तसेच त्यांच्या परिवाराने मुलांसोबत आकाशकंदील तयार केले. संध्याकाळी जादूच्या कार्यक्रमानंतर ‘स्वरूपसेवा टॅलेंट शो’ मध्ये मुलांनी गायन, नृत्य आणि कवितांच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
चौथ्या दिवशी मुलांना मुळशीतील गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगच्या वळणे कॅम्पसाईटवर नेण्यात आले. तिथे त्यांनी निसर्ग अनुभवला, मुळशी धरणाचे सौंदर्य पाहिले, आणि स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटला. यानंतर शिवसृष्टीला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतला.
पाचव्या दिवशी जीवनकौशल्ये या विषयावर सत्र घेण्यात आले. प्रभाकर साळेगावकर यांनी कवितांमधून मुलांशी संवाद साधला तर कर्नल मुखर्जी आणि कारगिल युद्धात शौर्य दाखवलेल्या दोन सैनिकांनी प्रेरणादायी अनुभव सांगितले. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला, स्वयंसेवकांनी डोरेमॉन आणि छोटा भीमचे रूप घेऊन मुलांचे मनोरंजन केले.
शेवटच्या दिवशी निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. पाच दिवसांच्या या स्नेहयात्रेत मुलांनी पुण्याचे रोषणाईने उजळलेले रूप, विविध उपक्रम आणि मधुरांगणचे मायेचे वातावरण अनुभवले. मेट्रोची आयुष्यातील पहिलीवहिली सफर व शनिवार वाड्याला भेट देऊन आनंदाची शिदोरी घेऊन सर्व सहभागी मुलेमुली आपल्या गावी परतले.
ही दिवाळी केवळ उत्सव नव्हती – ती होती प्रेम, समानता आणि आनंदाचा उत्सव. स्वरूपसेवा संस्थेच्या मधुरांगण प्रकल्पाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले की खरी दिवाळी म्हणजे फुलणारी मने आणि उजळणारे चेहरे.
आगळीवेगळी दिवाळी यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी स्वरुप सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अजित पटेल, संस्थापक सदस्य व वरिष्ठ पदाधिकारी राजकुमार मानधनिया, उमेश झिरपे, राजेश सारडा, अजित ताटे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. कार्यकर्ते सुयश मोकाशी, अंजली कात्रे व इतर अनेकांनी यांनी संपूर्ण दिवाळी मुलांसोबतच मधुरांगण येथे साजरी केली.



