मुलींचा सहज, तर मुलांचा संघर्षमय विजय
मुंबई ः बहरीन येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धेतील कबड्डीत भारताने दुहेरी सुवर्ण पदक पटकविले. मुलींच्या अंतिम सामन्यात भारतीय मुलींनी इराणाला ७५-२१ सहज नमवीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात भारताने अतितटीच्या लढतीत इराणला ३५-३२ असे चकवीत सुवर्ण पदक आपल्याकडे खेचून आणले.
मुलींच्या अंतिम सामन्यात लिलाया विजय मिळवीत असताना महाराष्ट्राच्या सेरेना म्हसकर हिने आपल्या अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली. मुलांचा सामना मात्र अत्यंत चुरशीने खेळला गेला. इराणाने आक्रमक सुरुवात करीत सलग २ गुण घेत आघाडी घेतली. पण त्याने दबून न जाता भारताने संयमी खेळ करीत हळूहळू गुण घेत ४-२ अशी आघाडी मिळविली. भारताने आघाडी घेतली, पण इराणाचा दबाव झुगारून देण्यात ते कमी पडले. सामान्याच्या शेवटच्या क्षणात रंगत अधिकच वाढली. इराणने आक्रमक खेळ करीत भारताला दडपणाखाली आणले. अखेर भारताने ३ गुणांनी सामना खिशात टाकला. महाराष्ट्राच्या प्रसाद दिघोळे यांनी दोन खेळाडूंत इराणच्या खेळाडूची अव्वल पकड करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलांचा अंतिम सामना पहाताना असे वाटत होते कि एखाद्या गल्लीत सामना पाहात आहे. पंचाचे सामन्यावर नियंत्रण दिसत नव्हते.



