राज्याचे क्रीडा मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर ः हरियाणा, ओडिशा, गुजरात या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच शासन क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी आणि खेळाडूंना सवलतींचा समावेश असलेले नवीन धोरण तयार करणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी येथे केले.

राज्यातील क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध असून, ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत युवा व क्रीडा क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याच्या दृष्टीने राज्यभरात ‘युवा व क्रीडा संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी युवा व क्रीडा संवाद झाला. संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी झालेल्या संवाद कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील क्रीडा संघटक, पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, खेळाडू आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले. या प्रसंगी माजी मंत्री सुरेश नवले, क्रीडा उपसंचालक उदय जोशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील साईच्या क्रीडा संचालक मोनिका घुगे, क्रीडा मंत्र्याचे ओएसडी व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आर्यन मॅन नितीन घोरपडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक सचिन देशमुख, एमजीएमचे डॉ दिनेश वंजारे, उदय कहाळेकर, अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांचे मनोगत ऐकल्यानंतर क्रीडा मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी सर्वांशी संवाद साधला. विकसित महाराष्ट्र २०४७ साठी नव्याने क्रीडा व युवा धोरण तयार केले जात असल्याचे सांगून क्रीडा मंत्री कोकाटे म्हणाले की, अनेकांनी चांगले मुद्दे मांडले आहेत. राज्य सरकारला खर्चाच्या काही मर्यादा आहेत. खूप सुधारणा करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत असलेला निधी पुरेसा नाही हे वास्तव आहे. निधीत वाढ करण्याची आवश्यकता आहे. महापालिका, सिडको, महसूल विभाग, केंद्र सरकार अशा विविध विभागांकडे असलेली क्रीडांगणे उपयोगात कशी आणता येईल याचा विचार नक्की करण्यात येईल.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात क्रीडा सुविधा, क्रीडा मार्गदर्शक यांची मोठी उणीव आहे. सुविधा निर्माण करण्यावर निश्चितच भर दिला जाईल. क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक देखील नियुक्त केले जातील. उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खेळाची विशेष आवड आहे. त्यांना योग्य मागणी केली तर ते लगेच निधी उपलब्ध करुन देतात. जिल्हा क्रीडा समिती, विभागीय क्रीडा संकुल समिती यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. लोकप्रतिनिधी, न्यायालयीन लढा अशा काही कारणांनी तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल यांची कामे रखडलेली आहेत. सुमारे ५००-६०० कोटी रुपये विविध कारणांनी अखर्चित आहेत. राज्याचे नवे क्रीडा धोरण हे उत्कृष्ट असावे यासाठी क्रीडा संवाद उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यातून नक्कीच चांगले क्रीडा धोरण तयार होणार आहे असे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कतार या देशात वाळवंट आणि ऑइल या दोनच गोष्टी आहेत. तरीही या देशाने मोठी प्रगती साधली आहे. कतार देशाशी आपला लवकरच करार होणार आहे. त्याचा फायदा क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच होईल. कॉमनेवल्थ क्रीडा स्पर्धा, आगामी ऑलिम्पिक २०३६ यांचे आयोजन भारतात करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्यात देखील गुजरात, हरियाणा, ओडिशा या राज्याप्रमाणे आधुनिक क्रीडा सुविधांचे नेटवर्क तयार केले जाईल. यासाठी उद्योग क्षेत्राची मदत घेतली जाईल. सीएसआर फंड मुंबईत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हा निधी राज्यभर उपयोगात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेतली जाईल. एका उद्योजकाला एक खेळ सोपवला तर राज्यभर क्रीडा क्षेत्राचे मोठे नेटवर्क उभे राहिल आणि त्याचा खेळाडूंना मोठा फायदा होईल असा विश्वास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.
क्रीडा संवादानंतर प्रसिद्धी माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रीडा विद्यापीठ उभारणी संदर्भात त्यांना विचारले असता याविषयी माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले. तसेच विभागीय क्रीडा संकुलातील रिकाम्या सुविधा अन्य कुणाला देता येतील का याची चाचपणी व माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम आणि क्रीडाप्रेम वाढावे म्हणून शाळांमध्ये ओपन जिमची संकल्पना राबविण्यात येणार आहे. शालेय स्तरावर क्रीडा कौशल्य विकासासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील. तसेच फिरते आरोग्य पथक शाळांमध्ये शारीरिक तपासणीसाठी पाठवले जाईल. महिला खेळाडूंसाठी वसतिगृह आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यासह जिल्हा क्रीडा संकुलांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ‘एक जिल्हा – एक खेळ – एक संघटना’ ही संकल्पना शासनाच्या विचाराधीन आहे, असे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ मकरंद जोशी, प्रा सागर मगरे, शुभम धूत, मीनाक्षी मुलीया, महेश इंदापूरे, निकिता लंगोटे, सतीश कापसे, माधव शेजूळ, राकेश खैरनार, अविनाश बारगजे, साक्षी कराड, कैलास माने, नितीन घोरपडे, सचिन देशमुख, मोनिका घुगे, विलास चंदने, राजीव बडवे, विनायक वझे, कविता कराड , गोकुळ तांदळे आदी क्रीडा संघटक, पदाधिकारी यांनी विविध सूचना यावेळी केल्या. या सूचनांची दखल घेऊन क्रीडा मंत्री कोकाटे हे प्रत्येक मनोगतानंतर त्यावर भाष्य करुन विषयाचे निरसन करत होते. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव देसाई यांनी आभार मानले.



