डी ११ टी २० लीग क्रिकेट ः संदीप सहानी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात यंग ११ संघाने डीएफसी श्रावणी संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारत अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात संदीप सहानी याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १५.२ षटकात सर्वबाद ७४ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग सहजपणे करत यंग ११ संघाने अवघ्या ७.४ षटकात एक बाद ७६ धावा फटकावत नऊ गडी राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

कमी धावसंख्येच्या या उपांत्य सामन्यात स्वप्नील खडसे याने १८ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. स्वप्नील चव्हाण याने १८ चेंडूत २२ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. खालीद झमान याने १४ चेंडूत चार चौकारांसह २० धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत शुभम मोहिते याने १५ धावांत तीन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. संदीप सहानी याने घातक गोलंदाजी करत १९ धावांत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वप्नील चव्हाण याने १३ धावांत दोन गडी बाद केले.
दुसरा उपांत्य सामना असरार ११ व लकी क्रिकेट क्लब यांच्यात होता. पावसामुळे हा सामना अर्धवट स्थितीत आहे. असरार इलेव्हनने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १४३ धावा काढल्या. लकी क्रिकेट क्लबने १४ षटकात सहा बाद ८५ धावा काढल्या होत्या. त्यावेळी पावसाचे आगमन झाले आणि सामना थांबवावा लागला. दुसरा उपांत्य सामना व अंतिम सामना रविवारी (२६ ऑक्टोबर) होतील असे संयोजक निलेश गवई यांनी सांगितले.



