मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या अडसूळ ट्रस्ट-कोकण कप सुपर लीग विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेमधील तिसऱ्या साखळी सामन्यात उमैर पठाण, जैतापूरचा आर्यन राऊत, प्रसन्न गोळे आदींनी अपराजित राहून विजय संपादन केला. प्रारंभापासून आघाडी घेत उमैर पठाणने सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत उशिरा सूर सापडलेल्या विराज बर्वेला नमविले.
दादर-पश्चिम येथील सिबीइयु सभागृहामध्ये न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतने अचूक फटक्यांचा खेळ साधत अपराजित शिवांश मोरेला चौथ्या बोर्डात नील गेम दिला. आर्यन राऊतचा पहिला बोर्ड ब्रेक टू फिनिश होतांना थोडक्यात हुकला. पुष्कर गोळेने ५-० असा जोरदार प्रारंभ करूनही अखेर अपराजित प्रसन्न गोळेने पुष्करला १७-१२ असे चकविले. अन्य सामन्यात तनया दळवीने वेदिका पोमेंडकरचा, ओम सुरते याने वेदांत हळदणकरचा, तीर्थ ठाकरने वेदांत मोरे याचा, शौर्य दिवेकरने चैतन्य पोमेंडकरचा, रविराज गायकवाडने हर्षदा रसाळचा तर ग्रीष्मा धामणकरने आर्या सोनारचा पराभव करून साखळी दोन गुण वसूल केले.
उद्घाटन प्रसंगी युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.



