सौरभ नवले, अर्शीन कुलकर्णीची दमदार अर्धशतके
चंदीगड ः रुतुराज गायकवाडचे शानदार शतक, सौरभ नवले आणि अर्शीन कुलकर्णी यांची दमदार अर्धशतके यांच्या बळावर महाराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुसऱया रणजी सामन्यात चंडीगड संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर सर्वबाद ३१३ धावसंख्या उभारली आहे.
महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ (८), सिद्धेश वीर (७) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर अर्शीन कुलकर्णी याने ५५ चेंडूत ५० धावा काढल्या. त्यात त्याने आठ चौकार व एक षटकार मारले. रुतुराज गायकवाड याने आक्रमक शतक साजरे केले. त्याने १६३ चेंडूंचा सामना करत ११६ धावांची खेळी करुन डावाला आकार दिला. त्याने १५ चौकार मारले.
कर्णधार अंकित बावणे (८) लवकर बाद झाला. विकेटकीपर सौरभ नवले याने शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने १२२ चेंडूत ६६ धावा काढल्या. त्यात त्याने सात चौकार व एक षटकार मारला. रामकृष्ण घोष याने ३१ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
चंदीगड संघाकडून जगजीत सिंग (३-७९), अभिषेक सैनी (३-५५), विशू कश्यप (२-४४) व रमण बिश्नोई (२-१४) यांनी प्रभावी कामगिरी केली.



