पुणे : लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे लातूर येथे नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित शिशुविहार प्राथमिक शाळा पुणे येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सलोनी किरण साळुंके हिने राज्यस्तरीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सलोनी साळुंके हिने २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २ मिनिटे २४ सेकंद व १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट १३ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. तिची निवड ४x१०० मीटर आयएम रिले आणि ४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले या प्रकारांसाठीही झाली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सलोनीची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही तिची पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वी ती स्विमिंग फेडरेशन नॅशनल्ससाठी दोन वेळा पात्र ठरली आहे.
सलोनीने आपल्या या यशाचे श्रेय शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी खिरिड, समस्त शिक्षकवर्ग, तिचे जलतरण प्रशिक्षक अमर मुरलीधरन आणि जयप्रकाश दुबळे, तसेच क्रीडा मार्गदर्शक आजोबा चंद्रकांत साळुंके तसेच आई-वडिलांना दिले आहे. सलोनीच्या या उल्लेखनीय यशामुळे शिशुविहार प्राथमिक शाळा आणि पुणे शहराचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे.



