नवी दिल्ली ः हंसिका लांबा आणि सारिका मलिक यांना २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ५३ किलो वजनी गटाच्या विजेतेपदाच्या लढतीत हंसिका जपानच्या हारुणा मोरिकावाकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षीच्या आशियाई २० वर्षांखालील रौप्य पदक विजेत्या सारिकाला २०२४ च्या २३ वर्षांखालील जागतिक रौप्य पदक विजेत्या रुका नातामीकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.
अशाप्रकारे भारताच्या महिला मोहिमेचा शेवट सात पदकांसह झाला. निशू (५५ किलो), नेहा शर्मा (५७ किलो), पुलकित (६५ किलो), सृष्टी (६८ किलो) आणि प्रिया मलिक (७६ किलो) यांनी या स्पर्धेत आधीच कांस्यपदके जिंकली होती. सविता (६२ किलो), हनी कुमारी (५० किलो) आणि दीक्षा मलिक (७२ किलो) यांचे अभियान पदक फेरीपूर्वीच संपले.
पुरुषांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेत, प्रविंदर (७४ किलो) कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या योशिनोसुके आओयागीकडून २-८ असा पराभव पत्करावा लागला. सुमित मलिक (५७ किलो), नवीन कुमार (७० किलो) आणि चंदर मोहन (७९ किलो) हे दिवसाआधीच स्पर्धेतून बाहेर पडले, तर सचिन (९२ किलो) शुक्रवारी स्पर्धेतून बाहेर पडला. पुढील दोन दिवसांत ६५ किलो गटात सुवर्णपदकासाठी सुजीत कलकल हा भारताची सर्वात मोठी आशा असेल.



