मुंबई : बहरीन येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धेतील कबड्डीत भारताने दुहेरी सुवर्ण पदक पटकविले. सुवर्ण पदक विजेत्या भारतीय मुलींच्या संघातील सेरेना मेघाली सचिन म्हसकर हिचे रविवारी अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी तिचे स्वागत केले.
या प्रसंगी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सरचिटणीस राजेश पडेलकर, ज्येष्ठ कबड्डी संघटक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मिनानाथ धानजी, आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा पालव (बारटक्के), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अद्वैता बांदेकर (मांगले), सेरेनाची आई शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मेघाली म्हसकर(कोरगावकर), वडील राष्ट्रीय खेळाडू सचिन म्हसकर, आजोबा जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू शशिकांत कोरगावकर, राज्य व उपनगर संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या “सुवर्ण कन्येचे” स्वागत केले.



