यवतमाळ ः महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मिशन महादेवा’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.
‘मेस्सी’सोबत खेळण्याची ऐतिहासिक संधी
या योजनेचा एक भाग म्हणून, १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. या निवड चाचणीतून निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे.
यवतमाळ जिल्हास्तरीय निवड चाचणी ३० ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. यशवंत स्टेडियम, तालुका क्रीडा संकुल, पुसद या ठिकाणी निवड चाचणी होईल. या निवड चाचणीसाठी १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ मध्ये जन्मलेल्या मुला-मुलींना सहभागी होता येईल. निवड चाचणीच्या दिवशी आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्राची सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे. सर्व खेळाडूंनी निवड चाचणी स्थळी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंकद्वारे आपली नोंदणी पूर्ण केलेली असावी.
यवतमाळचे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ किंवा जिल्हा फुटबॉल असोसिएशन यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.



