मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या अडसूळ ट्रस्ट-कोकण कप सुपर लीग विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धे मधील चौथ्या साखळी सामन्याअखेर जैतापूरचा आर्यन राऊतने साखळी ८ गुणांसह अपराजित राहून आघाडी घेतली. प्रारंभी आघाडी घेणाऱ्या प्रसन्न गोळे याला निर्णायक क्षणी अचूक फटके साधत आर्यन राऊतने प्रसन्नला १०-८ असे चकविले.
दादर-पश्चिम येथील सीबीइयु सभागृहामध्ये अचूक फटक्यांसह सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत उमैर पठाणने शिवांश मोरेला नील गेम दिला आणि सातवा साखळी गुण वसूल केला. अन्य सामन्यात पुष्कर गोळे याने राष्ट्रीय ख्यातीची कॅरमपटू तनया दळवीला, शौर्य दिवेकरने रविराज गायकवाडला तर ग्रीष्मा पोमेंडकरने वेदिका पोमेंडकरला पराभूत करून साखळी दोन गुण वसूल केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे व आयडियलचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.


