अष्टपैलू विकी ओस्तवालची प्रभावी गोलंदाजी, ४० धावांत सहा विकेट, महाराष्ट्राची १७० धावांची आघाडी
चंदीगड ः अष्टपैलू विकी ओस्तवालच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्र संघाने दुसऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात चंदीगड संघाविरुद्ध पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र संघाने बिनबाद ६६ धावा फटकावत आपली आघाडी १७० धावांची केली आहे. महाराष्ट्र संघाने या सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
या सामन्यात महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३१३ धावा काढल्या. त्यात रुतुराज गायकवाड (११६), अर्शीन कुलकर्णी (५०), सौरभ नवले (६६) यांची कामगिरी दमदार राहिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली. अष्टपैलू विकी ओस्तवाल याने ४० धावांत सहा विकेट घेऊन चंदीगड संघाची दाणादाण उडवून दिली. चंदीगड संघाचा पहिला डाव ७३ षटकात २०९ धावांत गडगडला. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात १०४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
चंदीगड संघाकडून निशुंक बिर्ला (नाबाद ५६) आणि रमण बिश्नोई (५४) यांनी थोडाफार प्रतिकार केला. विकी ओस्तवाल याने २१ षटके गोलंदाजी करत ४० धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेऊन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. रामकृष्ण घोष याने ५१ धावांत दोन बळी घेतले. मुकेश चौधरी (१-५०) व प्रदीप दधे (१-२१) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात ११ षटके फलंदाजी करत बिनबाद ६६ धावा काढल्या आहेत. पृथ्वी शॉ हा ४१ धावांवर तर अर्शीन कुलकर्णी हा २५ धावांवर खेळत आहेत. सद्यस्थितीत अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने १७० धावांची आघाडी घेतली आहे.



