नागपूरमध्ये ७५वी सिनिअर स्टेट बास्केटबॉल चॅम्पियनशिप (मुख्यमंत्री चषक)चे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
नागपूर : महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळवून देण्यासाठी ‘मिशन ऑलिंपिक’ची तयारी सुरू असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर येथे आयोजित ७५वी सिनिअर स्टेट बास्केटबॉल चॅम्पियनशिप (मुख्यमंत्री चषक) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नागपूर ही समृद्ध क्रीडा परंपरेसाठी प्रसिद्ध नगरी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “धरमपेठ क्रीडा मंडळाने गेल्या ५० वर्षांपासून क्रीडा विकासासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी या भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून राज्यातील बास्केटबॉल खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून परदेशी प्रशिक्षक, तसेच फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, मॅनेजर आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एक सक्षम क्रीडापटू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक सोयी-सुविधा महाराष्ट्र सरकार पुरवणार आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी जाहीर केले की, ‘मिशन ऑलिंपिक’ या विशेष उपक्रमाअंतर्गत राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच मानकापूर स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रीडा संकुल बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, “गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राने खेलो इंडियामध्ये सर्वाधिक पदके जिंकून देशात नंबर वन स्थान मिळवले आहे. ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षमतेची सशक्त झलक आहे.”
कार्यक्रमात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बास्केटबॉल खेळाडूंचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संदीप जोशी, धरमपेठ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.‘
मिशन ऑलिंपिक’मुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी नवे दार खुले होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला.



