निवृत्त क्रिकेटपटूंच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार
कोल्हापूर : इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या २०२५च्या निवडणूक प्रक्रियेत कोल्हापूरचा सुपुत्र आणि माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कमिटीवर आयसीए सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
अतुल गायकवाड हे सध्या रत्नागिरी येथे कस्टम अधीक्षक म्हणून कार्यरत असून, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद आणि अनुभवी क्रीडापटू म्हणून त्यांनी दीर्घकाळ क्रिकेट क्षेत्रात योगदान दिले आहे.
या निवडीसाठी केडीसीएचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, एमसीए अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार, एमसीए सचिव ॲड. कमलेश पिसाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अतुल गायकवाड यांनी सांगितले की, “मी आता इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करत आहे. आयसीए ही संस्था निवृत्त प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आली असून, महाराष्ट्रातील सर्व निवृत्त खेळाडूंना या प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”
अतुल गायकवाड पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र चॅप्टरच्या सदस्यांच्या हितसंबंधांचे आणि आवश्यकतांचे प्रतिनिधित्व आयसीए मुख्यालयाकडे मांडणे ही माझी जबाबदारी असेल. तसेच, अपेक्स कौन्सिलने जी जबाबदारी सोपवेल ती मी प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पार पाडेन.”
महाराष्ट्र हिताचे काम करणार
आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना अतुल गायकवाड म्हणाले, “महाराष्ट्र क्रिकेटसाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्यातील क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी आणि खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. मला संभाजीराजे, रोहित दादा पवार, कमलेश पिसाळ आणि अजिंक्य जोशी यांचे पाठबळ लाभले असून, महाराष्ट्र क्रिकेटच्या विकासासाठी मी मनापासून कार्य करणार आहे.”
अतुल गायकवाड यांच्या या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील निवृत्त आणि सध्याचे क्रिकेटपटू यांना एक नवे व प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



