मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स सर्कलच्यावतीने ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान नीला परचुरे आणि मधुकाका परचुरे स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन), गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा रंगणार असून स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी आपली नावे २९ ऑक्टोबरपर्यंत आपापल्या जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत. तर जिल्हा संघटनेने प्राप्त नावांची यादी ३० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे मेलद्वारे पाठवावीत असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने करण्यात येत आहे.



