डी ११ टी २० लीग क्रिकेट ः दीपक डांगी सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचा तिसरा हंगाम लकी क्रिकेट क्लब संघाने जिंकला. अंतिम सामन्यात लकी क्रिकेट क्लब संघाने यंग ११ संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दीपक डांगी याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर संयोजक निलेश गवई याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. मुसळधार पावसामुळे अनेकदा स्पर्धेत अडथळे निर्माण झाले. तरीही निलेश गवई याने या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.

अंतिम सामन्यात यंग ११ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात सहा बाद १३८ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना लकी क्रिकेट क्लब संघाने १४.५ षटकात चार बाद १३९ धावा काढून सहा विकेटने सामना जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात इम्रान अहमद याने शानदार फलंदाजी केली. त्याने ३५ चेंडूत ५९ धावा काढल्या. त्यात त्याने नऊ चौकार व दोन षटकार मारले. नितीन फोलाने याने आक्रमक अर्धशतक साजरे केले. नितीन याने ३० चेंडूत ५२ धावा फटकावल्या. त्यात त्याने तीन चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. ऋषिकेश तरडे याने २७ धावांची वेगवान खेळी साकारली.
गोलंदाजीत दीपक डांगी याने भेदक गोलंदाजी करत १४ धावांत तीन विकेट घेतल्या. या प्रभावी स्पेलने दीपक डांगीला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वहाब याने २५ धावांत तीन गडी बाद केले. सय्यद अब्दुल वाहेद याने २० धावांत एक बळी टिपला.
पारितोषिक वितरण सोहळा
विजेत्या आणि उपविजेत्या संघाला प्रमुख पाहुणे शिवाजी भाऊ चव्हाण, फिरोझ खान, प्रदीप जगदाळे, सुशील भाऊ रत्नपारखे, कुमार नायडू, इम्रान पटेल, रोहित सिरसाठ, मोहम्मद वसीम, बिपीन खंदारे व संयोजक निलेश गवई यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून बलवंत चव्हाण, साबळे सर, गुणलेखक संकेत पगारे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेला अमन अदलखा, डॉ गौरव चामले, तनवीर राजपूत, फिरोझ खान, शिवाजी चव्हाण, पराग शहापूरकर व दीपक इंगळे यांचे प्रायोजकत्व लाभले होते. त्यामुळे स्पर्धेचे आयोजन शानदारपणे करण्यात आले आणि स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली असे संयोजक निलेश गवई यांनी दिली.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
मालिकावीर ः स्वप्नील चव्हाण
फलंदाज ः प्रदीप जगदाळे
गोलंदाज ः मयूर वैष्णव
क्षेत्ररक्षक ः आसिफ खान
सामनावीर ः दीपक डांगी
कोट
पावसाचा अनेकदा अडथळा येऊन देखील डी ११ टी २० क्रिकेट स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. अनुभवी खेळाडूंसमोर त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध देखील केली. अनुभवी खेळाडूंची कामगिरी देखील सरस ठरली. अनुभवी व यंग टॅलेंट यांचा चांगला संगम या स्पर्धेत पहावयास मिळाला. आगामी काळात यंग टॅलेंटला अधिक संधी देण्याच्यादृष्टीने टी १० स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचा युवा खेळाडूंना अधिक फायदा होईल.

– निलेश गवई, मुख्य संयोजक.



