जळगाव ः वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामुळे अवघ्या भारतभर पोहोचलेल्या या प्रतिष्ठानाला अभिजात संगीताच्या क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठानचे देशभरातील अनेक प्रतिथयश संस्थान बरोबर कोलॅबोरेशन आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत वर्षात सुपरिचित असलेली कोलकात्याची आयटीसी संगीत रिसर्च अकादमी यांच्यासोबत प्रतिष्ठानचे नुकतेच कोलॅबोरेशन झाले असून दोन दिवसांचे मिनी संगीत संमेलनाचे आयोजन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

हे संमेलन शनिवार व रविवार म्हणजे १ व २ नोव्हेंबर रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगावच्या खासदार स्मिता वाघ, आयटीसीचे गुरू पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते होईल.
दोन दिवसीय या संगीत संमेलनात आयटीसीचे दोन स्कॉलर विद्यार्थी व दोन प्रतिथ यश कलावंत सहभागी होणार आहे. प्रथम दिवशीच्या प्रथम सत्रात स्कॉलर कौस्तव रॉय यांचे सरोद वादन होईल त्याला तबल्याची साथ रमेंद्र सिंग सोलंकी करतील. दुसरे सत्र अकादमीचे गुरू व प्रतिथयश गायक पं. ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्याची साथ युवा आश्वासक तबला वादक तेजोवृष जोशी तर संवादिनी साथ अनंत जोशी करतील.
रविवार अर्थात दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर व आर्या शेंदुर्णीकर यांच्या कथक व गुरूवंदनेने होईल. त्यानंतरचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामारू यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी तर संवादिनीची साथ अनंत जोशी करतील. या संगीत संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, नुपूर खटावकर आदी उपस्थित होते.



