छत्रपती संभाजीनगर : चेन्नई येथे २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी चव्हाणने देशात तृतीय क्रमांक पटकावून शहराचा आणि विद्यापीठाचा मान वाढविला आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे ६० विद्यापीठांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये मुंबई विद्यापीठाने विजेतेपद, तर पुणे विद्यापीठाने उपविजेतेपद, आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला.संभाजी चव्हाण हा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ संघातून खेळला होता. त्याची यंदाच्या ‘खेलो इंडिया’ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता पाचवीपासून मल्लखांबचा सराव सुरू केलेल्या संभाजीने जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याला राष्ट्रीय प्रशिक्षक आणि मल्लखांब खेळाचे अनुभवी प्रशिक्षक प्रशांत जमधाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
संभाजीच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा तुषार पवार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ सचिन देशमुख, डॉ माधवसिंग इंगळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सर्वेसर्वा बालाजी नरवडे, अध्यक्ष शिंदे, खजिनदार गोकुळ तांदळे, मुख्याध्यापक संजय वानखेडे, तसेच सुरेश परदेशी, सुरेश पठाडे, बाबासाहेब मोराळकर, राहुल चव्हाण, विनायक राऊत, राणा कदम, कविता रगडे, श्रीकांत वीर, साईचंद्र वाघमारे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशामुळे संभाजी चव्हाणकडून भविष्यात अधिक मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.



