क्रीडा संघटनांची राज्य सरकारकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव बदलून, खोटी कागदपत्रे तयार करून स्पर्धांमध्ये उतरण्याचे प्रकार वाढत असल्याने योग्य पात्र खेळाडूंना न्याय मिळत नाही. या खेळाडू तस्करीच्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नियम व तत्काळ कारवाईच्या मागणीचे निवेदन छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. प्रा चंद्रकांत गायकवाड आणि युवराज राठोड यांनी हे निवेदन दिले.
याबाबत विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर असोसिएशनकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. ६ व १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा उपसंचालक तसेच स्पर्धा आयोजकांनाही तक्रार अर्ज देण्यात आला होता.
काय आहेत प्रमुख तक्रारी?
अनेक वर्षांपासून शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जन्मतारखेत फेरफार
आधार कार्ड बदल, खादी-खोटी दस्तावेज तयार करण्याचे प्रकार
कमी वय दाखवून स्पर्धांमध्ये खेळाडूंना उतरविणे
योग्य व पात्र खेळाडूंचा बळी
स्पर्धा जिंकण्यासाठी पैशांचा वापर, व्यवहार यांचा वाढता शिरकाव
खेळाडूंची नोंद UDISE Plus वर नसताना स्पर्धेत सहभाग
खऱ्या प्रतिभेला अन्याय
खोट्या कागदपत्रांमुळे गुणवान खेळाडू मागे पडत आहेत व क्रीडा क्षेत्राची शुचिता धोक्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या विरोधात कडक तपास यंत्रणा उभी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय कारवाई अपेक्षित?
क्रीडा स्पर्धांतील दस्तावेज तपासणी प्रक्रिया मजबूत करावी
शाळांकडून केलेल्या चुकीच्या प्रकारांवर तयार स्वरूपात दंडात्मक कारवाई
क्रीडा शिक्षकांनाही जबाबदार धरून सखोल चौकशी
जिल्हास्तर ते राज्य स्तरापर्यंत कडक नियमांची अंमलबजावणी
असोसिएशनचे सचिव प्रा युवराज राठोड यांनी पत्रावर स्वाक्षरी केली असून, प्रत मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, क्रीडा संचालक, क्रीडा अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे.
खऱ्या गुणवंत खेळाडूंच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका क्रीडा संघटनांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.



