दिया चितळे व मनुष शाह यांची ऐतिहासिक कामगिरी

  • By admin
  • October 28, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

प्रतिष्ठित जागतिक टेबल टेनिस फायनल्ससाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली ः भारताच्या टेबल टेनिस क्षेत्रासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारताचे स्टार खेळाडू दिया चितळे आणि मनुष शाह यांनी क्रीडा इतिहासात नोंद करत प्रतिष्ठित जागतिक टेबल टेनिस फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय खेळाडू म्हणून मानाचा मुकुट मिळवला आहे.

वर्षभरातील जागतिक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एकत्र आणणारी ही स्पर्धा हाँगकाँग येथे १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे.दिया चितळे ही विद्यमान राष्ट्रीय विजेती आणि अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ६ मधील सर्वाधिक मूल्यवान भारतीय महिला खेळाडू आहे. तसेच मनुष शाह हा विद्यमान पुरुष राष्ट्रीय विजेता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा स्टार खेळाडू आहे. त्यांनी वर्षभर जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करून हे यश संपादन केले.

जागतिक टेबल टेनिस फायनल्स ही जागतिक टेबल टेनिस मालिकेची भव्य सांगता मानली जाते. जगातील सर्वोच्च १६ पुरुष व महिला खेळाडू तसेच अव्वल ८ मिक्स्ड डबल्स जोड्या मिळून एकूण १.३ दशलक्ष यूएस डॉलर्सच्या बक्षीस रकमेसाठी या स्पर्धेत झुंजतात. त्यामुळे ही स्पर्धा टेबल टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाची समजली जाते.या स्पर्धेसाठी पात्र ठरणारे दिया व मनुष हे केवळ मिक्स्ड डबल्समधील पहिले भारतीय नव्हेत, तर जागतिक टेबल टेनिस फायनलच्या कोणत्याही श्रेणीत प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत.

ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार कंटेंडर स्पर्धेतील ऐतिहासिक रौप्यपदकासह वर्षभरातील सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीचा हा परिपाक आहे.या ऐतिहासिक यशाबद्दल भावना व्यक्त करताना दिया चितळे म्हणाली की,
“फायनल्ससारख्या भव्य स्पर्धेत खेळण्याचा मान तर मोठा आहेच, पण हे करणारे पहिले भारतीय म्हणून आमची निवड होणं हा आणखी मोठा अभिमान आहे. भारतीय टेबल टेनिस कुठपर्यंत पोहोचू शकते याचे हे प्रतिक आहे. या क्षणात आमचा वाटा असेल याचा आनंद आहे आणि आम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी पूर्ण ताकद लावू.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *