सिनियर महिला टी २० ट्रॉफी ः अनुजा पाटील, तेजल हसबनीसची दमदार कामगिरी
सुरत ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिनियर महिला टी २० ट्रॉफी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने हरियाणा संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली आहे. अनुजा पाटील आणि तेजल हसबनीस या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने चमकदार कामगिरी बजावत स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. हरियाणा संघाविरुद्धचा सामना देखील याला अपवाद राहिला नाही. या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने हरियाणा महिला संघाला सहा षटकात सहा बाद ६३ धावांवर रोखले. महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी ६४ धावांचे आव्हान होते. महाराष्ट्र संघाने यशस्वी धावांचा पाठलाग करताना ५.२ षटकात चार बाद ६४ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
हरियाणा महिला संघाने प्रथम फलंदाजी केली. दिया यादव हिने सर्वाधिक २९ धावा काढल्या. तिने तीन चौकार व दोन षटकार मारले. अनुजा पाटील हिने घातक गोलंदाजी करत १३ धावांत पाच विकेट घेऊन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. ज्ञानेश्वरी पाटीलने २१ धावांत एक गडी बाद केला.
किरण नवगिरे (१) व गौतम नाईक (११) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर तेजस हसबनीस हिने दमदार फलंदाजी करत १३ चेंडूत नाबाद ३७ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार व दोन षटकार मारले.
कर्णधार अनुजा पाटील (१), श्वेता माने (१२) लवकर बाद झाल्या. तेजल हसबनीसच्या शानदार फलंदाजीने महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली.



