उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या ५ व्या एशियन ट्रेडिशनल कराटे स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
छत्रपती संभाजीनगर ः मुकुल मंदिर शाळेची प्रतिभावान कराटेपटू पायल शिंदे हिने अभिमानास्पद कामगिरी करत उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पाचव्या एशियन ट्रेडिशनल कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
न्यू दिल्ली–एनसीआर येथे १७ आणि १८ डिसेंबर २०२४ रोजी नॅशनल कराटे फेडरेशनतर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पायलने उल्लेखनीय कौशल्य दाखवत भारतीय संघात निवड निश्चित केली. या स्पर्धेत तिने १४ ते १६ वर्षे गट, ४५ किलोखालील वैयक्तिक कुमिते प्रकारात रौप्यपदक आणि वैयक्तिक काता प्रकारात कांस्यपदक मिळवत राज्य आणि शाळेचा मान उंचावला.
परिश्रम आणि सातत्याचे फळ
पायल शिंदे ही मुकुल मंदिर शाळेत इयत्ता दहावीत शिकत असून मागील तीन वर्षांपासून गरवारे कम्युनिटी सेंटर येथे सातत्याने कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तिने अल्पावधीत राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी साधत आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.
मान्यवरांकडून कौतुकाची थाप
पायलच्या कामगिरीबद्दल मुकुल मंदिर संस्थेचे अध्यक्ष कमांडर अनिल सावे, सचिव संजय लेकुरवाळे, संस्था सभासद, मुख्याध्यापक जयंत चौधरी, सुरेश परदेशी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे आणि शिहान सुरेश मिरकर यांनीही पायलचे कौतुक करत तिच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकाची अपेक्षा व्यक्त केली.
भारतासाठी आणखी एक पदकाची आशा
पायल शिंदेची ही निवड नाशिक तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून ५ व्या एशियन ट्रेडिशनल कराटे स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त केली जात आहे. तिच्या यशामुळे जिल्ह्यातील कराटेपटूंना प्रेरणा मिळाली असून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे येतील, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.



