तन्वी घारपुरे, यश ढेंबरे, तनय जोशी यांना सुवर्ण पदके
ठाणे ः अहिल्यानगर जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये नुकतीच महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३० जिल्ह्यातील हजाराच्या आसपास मुला-मुलींनी १५ व १७ वर्षे वयोगटात एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरीच्या गटात तसेच सांघिक स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सर्वप्रथम मुलांच्या सांघिक स्पर्धेत ठाण्याच्या मुलांच्या संघाने रौप्य पदक पटकावले. त्यांना अंतिम फेरीत पुण्याच्या संघाकडून २-० असा पराभव स्वीकारावा लागला. १७ वर्षा खालील या मुलांच्या संघात यश सिन्हा, यश ढेंबरे, तनय जोशी, मोहित कांबळे, अपूर्व दवाडते, कृत्या पटेल, या खेळाडूंचा समावेश होता.
खुल्या स्पर्धेत मुलांच्या दुहेरीच्या गटात ठाणेकर यश ढेंबरे व तनय जोशी या जोडीने सुवर्ण पदक पटकावताना आपल्या कामगिरीने सर्वांवर छाप टाकली. त्यांनी अंतिम फेरीत सयाजी शेलार (पुणे) आणि उदयन देशमुख (छत्रपती संभाजीनगर) या जोडीला २१-१०,२१-९ असे हरवून पराभवाचा धक्का दिला.
त्याच प्रमाणे ठाण्याची उगवती बॅडमिंटनपटू तन्वी घारपुरे हिने पुण्याच्या ओजस जोशीला साथीला घेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सार्थक नलावडे (छत्रपती संभाजीनगर) व दितीशा सोमकुवार (नागपूर) यांचा २१-११, २१-१६ असा सनसनाटी पराभव केला व सुवर्ण पदकावर नाव कोरले.
मात्र, यश ढेंबरेला सतरा वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये एकेरीमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचा उपांत्य फेरीत अवधूत कदम (पुणे) याच्याकडून १४-२१, ९-२१ असा पराभव झाला.
अशा तऱ्हेने अहिल्यानगर येथे झालेल्या या राज्याची सब ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ठाणेकरांनी उत्तम कामगिरी करून सर्वांवरच आपली छाप टाकली. या संघाबरोबर फुलचंद पासी आणि एकेंद्र दर्जी यांनी प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम पाहिले या सर्व प्रशिक्षकांचे व खेळाडूंचे योजना प्रमुख श्रीकांत वाड तसेच ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी कौतुक केले आहे व या उभरत्या खेळाडूंना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



