मुंबई ः १४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली होणार असून या स्पर्धेत आशियातील अग्रगण्य जिम्नॅस्ट आपली कौशल्ये, नियंत्रण आणि कलात्मकता दाखवणार आहेत.स्पर्धैत १९ देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी चेंबूर येथील श्री नारायण आचार्य विद्यालयातील १९ खेळाडू भारतीय संघात निवडले गेले आहेत, ही संस्थेसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. भारतीय संघात जागतिक खेळांचे विजेते ऋतुजा जगदाळे, अर्णा पाटील, आचल गुरव यांचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते आकाश गोसावी, आदित्य खसासेही भारताचं प्रतिनिधित्व करतील. अलीकडे उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सर्व सुवर्णपदके जिंकणारे सान्वी शिंदे , आदित्य दिघे या स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.
गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. अनुभवी प्रशिक्षक राहुल ससाणे संघाच्या तयारीबाबत म्हणाले की, “आपले खेळाडू शिस्त, निष्ठा आणि मेहनतीने प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येकाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं महत्त्व समजलं आहे. ते आपली सर्वोत्तम कामगिरी करतील. “
भारतीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक समितीचे प्रमुख सुमित एम के म्हणाले की, “आमच्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे संतुलित मिश्रण आहे. गोव्यात ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे भारतातील अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सचा दर्जा आणखी उंचावेल.”
आंतरराष्ट्रीय ज्यूरी योगेश पवार यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी तांत्रिक अचूकता आणि कलात्मक सादरीकरणात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धात्मक दर्जा नव्हे, तर भारतीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सची वाढती ताकद देखील दाखवेल.



