बुद्धिबळ स्पर्धा आयोजकांसाठी देखील प्रशिक्षण वर्ग हवेत !

  • By admin
  • October 30, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love
  • केतन खैरे, बुद्धिबळ प्रशिक्षक आणि संघटक, पुणे. 

जागतिक बुद्धिबळ संघटनेने प्रशिक्षकांसाठी तसेच बुद्धिबळ पंचांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले आहेत. याच धरतीवर आता स्पर्धा संयोजकांसाठी सुद्धा असे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत आणि यासाठी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने पुढाकार घ्यावा असे मला सुचवावेसे वाटते.

लोकल किंवा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा या महाराष्ट्रात भरपूर होत आहेत. लाख – दोन लाख रोख बक्षीस रकमेच्या स्पर्धांना असलेल्या एन्ट्री फी मुळे नुकसान वगैरे होण्याची शक्यता आता ९९ टक्के संपली आहे. चुकून थोडे नुकसान झाल्यास ते भरून काढायला स्पर्धा संयोजकांना जड जात नाही.

एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा एखाद्या आडवाटेच्या गावात असल्यास सुद्धा यशस्वी होतात. बहुतांश स्पर्धा ठिकाणी थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता गृहीत धरून पालक – खेळाडू अशा स्पर्धांमध्ये भाग घेतात. बुद्धिबळ संबंधित लोकांची सहन शक्ती ही बाकीच्या खेळातील लोकांपेक्षा जास्त असल्याने खूपच खराब वातावरण असल्याशिवाय कोणी तक्रार देखील करत नाहीत.

मात्र, दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालणाऱ्या स्पर्धांसाठी पूर्णपणे वेगळे नियोजन लागते. स्पर्धा स्थळ, तेथील स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आजुबाजूस योग्य दरात उपलब्ध अल्पोपहार, जेवणाची सोय, तेथून जवळपास रहायची व्यवस्था वगैरे छोट्या दिसणाऱ्या गोष्टी जर पाळल्या गेल्या नाहीत तर स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही.

राष्ट्रीय पातळीवर किंवा फिडे रेटिंग स्पर्धा आयोजीत करताना लोकल स्पर्धांना लागणारे निकष ठेऊन चालत नाही. यासाठी खूप अभ्यास हवा. फिडे रेटेड स्पर्धा त्यात देखील क्लासिकल स्पर्धा आयोजित करायची असल्यास स्पर्धा निर्दोषपणे यशस्वी होण्यासाठी वर नमूद केलेल्या गोष्टींसह इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तरच ती स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी ठरते.

लोकल / जिल्हा / राज्य पातळीवर एक दिवसीय स्पर्धा घेणारा उत्साही संयोजक दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची फिडे रेटेड स्पर्धा आयोजित करण्यास गेला आणि त्याचा गृहपाठ कच्चा राहिला तर मात्र त्या स्पर्धेची पूर्णपणे वाट लागलीच समजा.
संयोजक बुडतोच, पण विनाकारण खेळाडू आणि पालकांना सुद्धा मनस्ताप सहन करायला लागतो.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी /शहर किंवा गावात स्पर्धा होते, त्या ठिकाणचे नाव बुद्धिबळ क्षेत्रात ब्लॅक लिस्ट मध्ये जाते. हा धोका सगळ्यात मोठा असतो.

एखाद्या ठिकाणची स्पर्धा अयशस्वी ठरल्यास पुढच्या स्पर्धेच्या वेळी त्याच ठिकाणी खेळायला जायला पालक खेळाडू सहसा तयार नसतात. त्याच वेळी लोकप्रिय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी खेळाडू – पालक आवर्जून वेळ काढतात.
सुदैवाने महाराष्ट्रात यशस्वी स्पर्धांची संख्या जास्त आहे.

बुद्धिबळ खेळाचा प्रसार खूप वेगात होत आहे. दिवसेंदिवस स्पर्धक संख्या वाढत आहे. तरीही हे क्षेत्र तसे मोठ्या  कुटुंबाप्रमाणेच आहे. “माऊथ पब्लिसिटी” या मुख्य जाहिरात माध्यमावर हे क्षेत्र सध्यातरी अवलंबून आहे. त्यामुळे “चांगली स्पर्धा” आणि “वाईट स्पर्धा” हे दोनच पर्याय इथे उपलब्ध आहेत. परिणामी, स्पर्धा आयोजकांनी किती सावधपणे काम करणे अपेक्षित आहे याचा अंदाज नवीन संयोजकांना असणे अपेक्षित आहे.

मुख्यतः सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पर्धांची माहिती सर्वांना कळत आहे. अशावेळी प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी यांच्यातील सीमारेषा अत्यंत धूसर झाली आहे हे स्पर्धा संयोजकांनी कायम लक्षात ठेवायला हवे.

मानवी स्वभावानुसार स्पर्धेच्या ठिकाणी संयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या चांगल्या सोयी सुविधांच्या चर्चा सोशल मीडियावर खूपच कमी होतील, पण स्पर्धा स्थळावर किरकोळ असुविधा निर्माण झाल्यास लगेचच त्यासंबंधित पोस्ट सोशल मीडियावर पडू लागतात याचा अनुभव सर्वांनाच आला असेल.

पुणे, नागपूर, सांगली, मुंबई, कोल्हापूर, अहिल्या नगर, जळगाव ही शहरे आणि यातील लोकप्रिय स्पर्धा कधी घोषित होतात याची खेळाडू वाट पहात असतात. त्यामानाने इतर ठिकाणी जास्त दिवसांच्या स्पर्धा खूपच तुरळक पद्धतीने होतात. इतर ठिकाणी एक दिवसीय स्पर्धांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांच्या स्पर्धा घेण्यास संयोजक तयार होत नाहीत. संयोजन खर्चात होणारी दुप्पट तिप्पट वाढ आणि खेळाडूंची निवास व्यवस्था हे मुख्य मुद्दे या मागे आहेत. पण स्पर्धेस प्रायोजक मिळाल्यास यावर मार्ग निघतो आणि याठिकाणच्या स्पर्धा देखील यशस्वी होऊ शकतात.

या संदर्भाने उत्साही आणि तरुण संयोजकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण करणे गरजेचे आहे. तरच बुद्धिबळाचा सर्वांगीण विकास होईल. अन्यथा सध्या जी अवस्था आहे, तीच पुढील दहा वर्षांनी सुद्धा कायम राहील.

महाराष्ट्रात असलेल्या ३६ जिल्ह्यांपैकी फक्त ७ जिल्ह्यात नियमित मोठ्या स्पर्धा होतात आणि इतरत्र काहीच नाही हे चित्र योग्य नाही. यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालक संघटनांचे प्रबोधन करणे आणि मोठ्या स्पर्धा घेण्यास नवीन संयोजकांना प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे.

गुकेश, प्रज्ञानंद सारखे चांगले खेळाडू घडवायचे असतील, तर क्लासिकल स्पर्धांमध्ये खेळायचा अनुभव मिळाल्याशिवाय खेळाडूंचा दर्जा वाढणार नाही. एकदिवसीय स्पर्धांमुळे खेळाडूंच्या खेळाच्या दर्जात कोणतीही सुधारणा होत नाही. केवळ काही चांगल्या खेळाडूंना रोख बक्षिसे मिळविण्यासाठी आणि संयोजकांना चांगला प्रॉफिट होण्यासाठी एकदिवसीय स्पर्धांचा चांगला उपयोग आहे. त्यामुळे मूलभूत बुद्धिबळ प्रसार हवा असल्यास राज्यात सर्वत्र क्लासिकल स्पर्धांची संख्या वाढविणे, जेणेकरून स्थानिक ठिकाणी कमी खर्चात खेळाडूंना स्वतःचा खेळातील दर्जा सुधारण्याची संधी उपलब्ध होईल. याचसाठी आता स्पर्धा संयोजनाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करायला हवेत. राज्यातील पालक संघटनांना जमत नसेल तर बुद्धिबळ प्रेमी व्यक्तींनी या बाबत पुढाकार घेऊन क्रीडा प्रसार करायला कोणत्याच पालक संघटनेची हरकत नसेल असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *