व्हीटी स्टेशनवरील बूट पॉलिशपासून मुंबई विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

  • By admin
  • October 30, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

डॉ विश्वंभर वसंत जाधव : संघर्ष, शिक्षण आणि कर्तृत्वाची अद्वितीय कहाणी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हीटी स्टेशन)…धावपळीने भरलेले, स्वप्नांची लगबग वाहणारे ते स्टेशन. त्याच प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करत आपल्या आयुष्याची दिशा शोधणारा एक निर्धाराचा, स्वप्नाळू मुलगा – आज मुंबई विद्यापीठाचा सहाय्यक प्राध्यापक, प्रतिष्ठित सिनेट मेंबर, संशोधक, आंतरराष्ट्रीय वक्ते आणि अभिनेत्याच्या रूपाने जगभरात आपले नाव झळकवत आहे. डॉ विश्वंभर वसंत जाधव – या नावामागे आहे संघर्षाचे साहस, जिद्दीची ज्योत आणि शिक्षणाच्या बळावर घडलेली प्रेरणादायी यशोगाथा.

अत्यंत हलाखीतून उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व

दररोज स्टेशनवर बूट पॉलिश करत शिक्षणाची सांगड घालणारा आणि रात्रीच्या कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आज अनेकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ बनला आहे. आर्थिक अडचणींनी वेढलेल्या बालपणानंतरही हार न मानता त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि स्वतःचे भविष्य घडवले.

शैक्षणिक उत्कृष्टतेची आंतरराष्ट्रीय झेप

आज मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ जाधव यांनी जगातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तसेच रशिया, जपान, मलेशिया, इथिओपिया, कझाकिस्तान, व्हिएतनाम इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर सादर करून भारतीय क्रीडा-शैक्षणिक क्षेत्राची छाप उमटवली. आजपर्यंत ५० पेक्षा अधिक संशोधन निबंध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले असून रशिया व व्हिएतनाम येथे ‘बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड’ ने त्यांचा गौरव झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील ५ विद्यार्थ्यांनाही सर्वोत्तम संशोधन पुरस्कार प्राप्त झाले आहेत – हे त्यांच्या परिपूर्ण मार्गदर्शकत्वाचे द्योतक आहे.

आता श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सादरीकरण

त्यांच्या कर्तृत्वाची आणखी एक शिदोरी म्हणजे सबरागामुवा विद्यापीठ, बालांगोडा, श्रीलंका येथील क्रीडा विज्ञान व शारीरिक शिक्षण विभागातर्फे हिक्काडुवा येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अप्लाईड स्पोर्ट्स कॉन्फरन्समध्ये निमंत्रण. या परिषदेत डॉ जाधव “भारत आणि श्रीलंकेतील खेळांची आर्थिक शाश्वतता” या विषयावर संशोधन पेपर सादर करणार आहेत.या मानाच्या निमंत्रणाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा रवींद्र कुलकर्णी, प्र–कुलगुरू डॉ अजय भामरे, कुलसचिव डॉ प्रसाद कारंडे यांसह प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व : संशोधक + समाजसेवक + अभिनेता

अकादमिक क्षेत्राबरोबरच अभिनयक्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक व नाट्यकर्मी प्रा वामन केंद्रे यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत, त्यांनी व्यावसायिक नाटकं आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. कोविड काळात त्यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय असून अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. एनएसएस प्रोग्राम ऑफिसर, पर्यावरणप्रेमी, सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आणि मुंबई विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवरील सदस्य म्हणून त्यांनी बहुविध कार्य केले आहे.

प्रेरणा देणारा संदेश
“परिस्थिती नव्हे, तर निर्धार यशाचे खरे शिल्पकार ठरते,” हे डॉ विश्वंभर जाधव यांचे जीवन सांगते. बूट पॉलिश करणाऱ्या हातांनीच आज शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळविण्याची क्षमता कमावली आहे. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशकथा नसून – ‘स्वप्नांना पंख देणाऱ्या शिक्षणाचा, न झुकणाऱ्या जिद्दीचा आणि समाजाला काहीतरी परत देण्याच्या भावनेचा’ जिवंत आदर्श आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *