रायझिंग क्रिकेट अकॅडमी, गंगाखेडचे चार खेळाडू परभणी जिल्हा संघात निवड
गंगाखेड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील इन्विटेशन क्रिकेट स्पर्धेसाठी परभणी जिल्हा क्रिकेट संघात रायझिंग क्रिकेट अकॅडमी, गंगाखेड येथील चार प्रतिभावान खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर स्थान पटकावले आहे. या यशामुळे गंगाखेड तालुक्याच्या क्रिकेट इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
परभणी जिल्हा संघासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये समर तमखाने (अष्टपैलू), क्षितिज चिलगर (वेगवान गोलंदाज), सय्यद सुफियान (वेगवान गोलंदाज) आणि शिवराय भोसले (फलंदाज) यांचा समावेश आहे.
या चौघा खेळाडूंना रायझिंग क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक वेदांत महाजन यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. नियमित सराव, तांत्रिक प्रशिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्तीमुळे या खेळाडूंनी जिल्हा निवड चाचण्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली.
या भावी क्रिकेटपटूंना आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, गंगाखेडचे प्राचार्य डॉ बी एम धूत, उपप्राचार्य डॉ चंद्रकांत सातपुते आणि क्रीडा संचालक यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले.
रायझिंग क्रिकेट अकॅडमीच्या या यशामुळे गंगाखेड तालुक्याला राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळाली असून, स्थानिक क्रीडा प्रेमी आणि पालक वर्गाकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
क्रिकेट क्षेत्रातील ही दमदार भरारी आगामी काळात अनेक उभरत्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



