दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजन, स्पर्धेचे यंदाचे ४९ वे वर्ष
ठाणे ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ४९ वी एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ पासून दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे येथे सुरू होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक आमदार संजय केळकर यांनी दिली.
ही स्पर्धा २ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, उद्घाटन समारंभाचे उद्घाटन माजी टेस्ट क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष असून, ठाणे जिल्ह्यातील होतकरू व गुणी क्रिकेटपटू मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेतून आतापर्यंत ७५० पेक्षा अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
“या स्पर्धेतून अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू घडले असून, त्यांच्यामार्फत ठाण्याची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध झाली आहे, याचे आम्हाला समाधान आणि अभिमान आहे,” असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
ही माहिती ‘स्पोर्ट्स प्लस’चे सहसंपादक प्रमोद वाघमोडे यांच्याशी बोलताना आमदार केळकर यांनी दिली.



