पार्थ गाडेकर व साक्षी गायकवाडला सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात पार्थ गाडेकरने उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामन्यात नाथ व्हॅली स्कूलच्या विराज देवरा याचा १२-१४, ११-७, ११-५ असा पराभव करून सुवर्णपदक निश्चित केले. प्रारंभीचा सेट गमावूनही पार्थने दमदार पुनरागमन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात साक्षी गायकवाडने प्रभावी वर्चस्व राखत अंतिम सामन्यात रिया मानेचा ११-४, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदक पटकावले. दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य व आत्मविश्वासाची छाप पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पार्थ गाडेकर आणि साक्षी गायकवाड यांची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंना डॉ रोहिदास गाडेकर व श्रीराम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. पार्थ व साक्षीच्या यशाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संचालक रंजीत दास, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दामोदरन, तसेच किरण चव्हाण, समाधान बेलेवार, सिद्धांत श्रीवास्तव, अभिजीत तुपे यांच्यासह शिक्षकवृंदाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


