छत्रपती संभाजीनगर : सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांच्या सान्निध्यात व हिरवाईने नटलेल्या एमजीएम गोल्फ कोर्स येथे ३१ ऑक्टोबर, १ आणि २ नोव्हेंबर या कालावधीत एमजीएम गोल्फ लीगचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील एकमेव पूर्ण विकसित गोल्फ कोर्स म्हणून ओळख असलेल्या या मैदानावर यंदाच्या स्पर्धेत देश-विदेशातील दिग्गज गोल्फर्स आमनेसामने भिडणार आहेत.
एका पत्रकार परिषदेत या स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी महापालिका आयुक्त जी श्रीकांत, एमजीएम गोल्फ कोर्सचे रणजीत कक्कड, उपायक्त अंकुश पांढरे, मनपा क्रीडा विभाग प्रमुख संजीव बालय्या यांच्यासह विविध दिग्गज खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.

एंड्युरन्स टायटल स्पॉन्सर
यावर्षीच्या एमजीएम गोल्फ लीगसाठी एन्ड्युरन्स ही प्रतिष्ठित कंपनी टायटल स्पॉन्सर म्हणून जोडली गेली आहे. एकूण ८ संघ आणि ८८ गोल्फर्स या स्पर्धेत विजेतेपदासाठी संघर्ष करणार आहेत.
स्पर्धेत सहभागी संघ
या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग आहे. त्यात प्रामुख्याने पुणे लायन्स, मीनाक्षी ईगल्स, ईगल फोर्सेस, सत्यम स्विंगर्स, झेन स्ट्रायकर्स, वन वर्ल्ड गोल्फर्स, लाईफलाईन मॅव्हरिक्स आणि तायल वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.
भव्य बक्षीस रक्कमविजेता संघाला एकूण पाच लाख रुपये रोख पारितोषिक प्रायोजक मनजीत प्राइड आणि रेलोमी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. उपविजेता संघाला ३ लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रायोजक एसके इन्फ्रा यांच्यावतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे इव्हेंट पार्टनर्स छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि एसीई गोल्फिंग हे आहेत. तसेच को-स्पॉन्सर्स म्हणून नेक्स्ट फर्निचर, एमजीएम विद्यापीठ, रन एमजीएम स्कूल्स, वन वर्ल्ड मनजीत प्राईड, मीनाक्षी रियल्टर्स, रेलोमी, भवानी गॅस सर्विसेस यांचा समावेश आहे.
टीम ओनर्स
या लीगमध्ये सुनील अग्रवाल, विजय अग्रवाल, सुनील तायल, अतुल विभांडिक (मुंबई), नितीन बगाडिया व नवीन बगाडिया, विक्रांत भाले, गिरीश गायकवाड (पुणे), योगेश गाधवाल (पुणे), राजा नंदी (पुणे), राजीव पुसळकर (पुणे), अँड्राईव्ह पिंटो (पुणे) या टीम ओनर्स यांचा सहभाग आहे.
ही लीग म्हणजे खेळ, सौंदर्य, लक्झरी आणि समुदायभावना यांचा संगम ठरणार असून, गोल्फप्रेमींसाठी हा क्रीडा उत्सव पर्वणी ठरणार आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून या भव्य गोल्फ फिएस्टाचे दिमाखदार आयोजन जाणून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


