 
            पुणे ः साहसाचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे ! गिरिप्रेमीच्या जीजीआयएमतर्फे आयोजित ४२वा बेसिक रॉक क्लायम्बिंग कोर्स सिंहगडाच्या डोंगरकड्यावर उत्साहात सुरू झाला असून देशभरातून आलेले २२ तरुण गिर्यारोहक या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
पुढील चार दिवस सहभागी विद्यार्थी रॉक क्लायम्बिंगच्या मूलभूत कौशल्यांसोबतच रॅपलिंग, जुमरिंग, दोरीचे महत्वाचे गाठी बांधणे, उपकरणांचे योग्य हाताळण, फर्स्ट एड, नेव्हिगेशन आदी महत्त्वाच्या घटकांमध्ये सखोल प्रशिक्षण घेणार आहेत. गिरिप्रेमीचे अनुभवी वरिष्ठ गिर्यारोहक आणि प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडत आहे.
या माध्यमातून नवोदित गिर्यारोहकांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक सक्षमता आणि पर्वतांबद्दलची सजगता वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे म्हणाले की, “या कोर्सच्या माध्यमातून तरुणाईमध्ये पर्वत प्रेम आणि साहस मूल्यांची जाणीव अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींना ज्ञानवर्धक आणि रोमांचकारी अनुभवासाठी शुभेच्छा!”
सिंहगडाच्या निसर्गरम्य कड्यावर सुरू झालेला हा कोर्स नवनवीन पर्वत प्रेमी घडवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.



