 
            छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसीतर्फे आयोजित आणि एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए मान्यताप्राप्त १४ वर्षांखालील राष्ट्रीय क्ले कोर्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी उत्साहात सुरुवात होणार आहे. देशभरातून मुले व मुली मिळून २१६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून स्पर्धा १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे.
पद्मजा रमेश (कर्नाटक) हिला मुलींच्या गटात तर कौस्तुभ सिंग (उत्तर प्रदेश) याला मुलांच्या गटात अव्वल मानांकन मिळाले आहे. एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले, “या राष्ट्रीय स्पर्धेमुळे उदयास येणाऱ्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळते.” त्यांनी मराठवाड्यात वाढत्या टेनिस उपक्रमांचे कौतुक करत वर्षा जैन यांच्या टेनिस प्रसारातील योगदानाची प्रशंसा केली.
वर्षा जैन या स्पर्धा संचालक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी सुपरवायझर वैशाली शेकटकर, सेंटर प्रमुख आशुतोष मिश्रा, अभिनव मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, रामय्या कोंकट्टी आदी उपस्थित होते. पात्रता फेरी १-२ नोव्हेंबर, तर मुख्य ड्रॉ ३ नोव्हेंबरपासून खेळवला जाईल. विजेते व उपविजेत्यांना करंडक आणि गुण प्रदान केले जातील.



