ठाणे (रोशनी खेमानी) ः चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याचा उदयोन्मुख खेळाडू हर्ष राऊत याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
४ बाय १०० मीटर रिले क्रीडा प्रकारात हर्षने रौप्यपदक पटकावले, तर १०० मीटर वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेत १०.४२ सेकंदांची प्रभावी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. या दुहेरी यशाने त्याने भारताचं आणि ठाण्याचं नाव उज्वल केलं आहे.
हर्षने अत्यंत उत्साहपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आपली क्रीडा क्षमता सिद्ध केली आहे. सध्या हर्ष राऊतचा प्रशिक्षक निलेश पाटकर असून, त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली आणि पालकांच्या अखंड प्रोत्साहनामुळे हर्षने हे यश संपादन केले आहे.
इयत्ता दहावीपर्यंत हर्षचे शिक्षण श्री मावळी मंडळ हायस्कूल, ठाणे येथे झाले असून, सुरुवातीच्या काळात त्याने प्रा प्रमोद वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले.
प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले की, मला अत्यंत अभिमान वाटतो की नर्सरीपासून दहावीपर्यंत माझ्या प्रशिक्षणाखाली वाढलेला हा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उजळवतो आहे. एका प्रशिक्षकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंददायी क्षण दुसरा असू शकत नाही.”
हर्ष वडील संतोष राऊत म्हणाले की प्रमोद सरांनी ओळखलेला हा हिरा आज आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकतो आहे, ही गोष्ट सरांच्या व आमच्या सर्वांच्या जीवनातील अतिशय अभिमानास्पद आणि आनंददायी क्षणांपैकी एक ठरली आहे.
आजच प्रा प्रमोद वाघमोडे यांचे गुरुवर्य, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील नानासाहेब मोटे यांनी हर्ष आणि त्याचे प्रशिक्षक प्रमोद वाघमोडे या गुरु–शिष्य जोडीचा शाल, पुष्पगुच्छ व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित छोटंसं पुस्तक देऊन सत्कार केला.
या प्रसंगी नानासाहेब मोटे म्हणाले की, प्रमोद सरांची ठाण्यातील सुरुवात ज्या कार्यालयातून झाली, त्याच ठिकाणी आज त्यांच्या शिष्याचा सत्कार होणं ही अत्यंत पवित्र आणि अभिमानास्पद घटना आहे. अशा समर्पित प्रशिक्षकाकडून हर्षसारख्या खेळाडूची घडण होणं हे ठाण्याचं भाग्य आहे. मला ठाम विश्वास आहे की हर्ष एक दिवस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना नक्की दिसेल.”
असं सांगून त्यांनी आनंदाने हसत हर्ष आणि प्रमोद सर या दोघांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद सरांनी खास करून हर्षच्या आई आणि बाबांचे कौतुक केले. हर्ष याचे वडील संतोष राऊत, काका दिगंबर राऊत व बहिण परिनीता राऊत आदी उपस्थित होते.


