विजेत्याला मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक
अहिल्यानगर ः शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन प्रायोजित आणि अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या विजेत्यास एक लाख रुपये रोख पारितोषिक तर विविध गटांमध्ये करंडकांसह पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
या स्पर्धेस देशभरातून खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र यासह विविध राज्यांतून २०० पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे. इंटरनॅशनल मास्टर आदित्य डिंगरा (हरियाणा), राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार असल्याचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ५ वर्षांचा सर्वात लहान आणि ८३ वर्षीय ज्येष्ठ खेळाडूही स्पर्धेत आपली बुद्धिमत्ता आजमावणार आहेत, अशी माहिती संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी दिली. बुधवारी सकाळी ११.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या खेळविण्यात येतील. रविवारी दुपारी २ वाजता बक्षीस वितरण करण्यात येईल, अशी माहिती सचिव यशवंत बापट यांनी दिली.
स्पर्धेचे पंच म्हणून विनिता श्रोत्री, श्रद्धा विंचवेकर, शार्दुल तापसे आणि पवन राठी कार्यरत राहणार असून त्यांना ८ सहाय्यक पंचांची टीम मदत करणार आहे.
नोंदणी व माहितीसाठी संपर्क : यशवंत बापट – ९३२६० ९२५०१ आणि पारूनाथ ढोकळे – ९८५०७ ०४२६८



